सहारनपूर : नानौता किसान सहकारी साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक ललित कुमार पीसीएस यांनी सांगितले की, यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्याने १५८ दिवसांत जवळपास ६६ लाख ५० हजार क्विंटल उसाचे गाळप करून ६ लाख ५० हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी उतारा ९.८२ टक्के आहे. तर गेल्यावर्षी २०२०-२१ मध्ये १७५ दिवसांत ७३ लाख ८० हजार क्विंटल ऊस गाळप करून सात लाख ४० हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते. ऊस बिलांबाबत माहिती देताना ललित कुमार म्हणाले की, कारखान्याने २० जानेवारी २०२२ पर्यंत खरेजी केलेल्या ऊसापोटी ११० कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. तर आगामी १५-२० दिवसांत ५५ ते ६० कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात येणार आहेत.
सरव्यवस्थापक ललित कुमार पीसीएस म्हणाले की, फेडरेशनशी बोलून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. साखर विक्री करून अथवा इतर स्त्रोतांमधून ऊस बिले दिली जाऊ शकतील का याचे प्रयत्न सुरू आहेत. सरव्यवस्थापकांनी सांगितले की, जोपर्यंत शेतकऱ्यांचा ऊस शेतात शिल्लक आहे, तोपर्यंत कारखाना सुरूच राहील. सध्याची स्थिती पाहिली तर आगामी तीन आठवडे कारखाना सुरू राहील अशी अपेक्षा आहे.