नवी दिल्ली : शेजारी देश श्रीलंकेत सध्या आर्थिक संकट घोंघावत आहे. आता आणखी एक शेजारी देश नेपाळही आर्थिक संकटाशी सामना करण्याच्या स्थितीत आहे. त्याची स्थितीही श्रीलंकेसारखी होऊ नये अशी चर्चा सुरू झाली आहे. नेपाळचा मुद्दा आता राजकीय बनत आहे. तर विरोधी पक्ष सातत्याने श्रीलंकेसारखी स्थिती होत असल्याचे म्हणत आहेत. अर्थशास्त्रज्ञांनी नेपाळची स्थिती श्रीलंकेपेक्षा वेगळी असल्याचे म्हटले आहे.
याबाबत आजतक डॉट इनवर प्रकाशित वृत्तानुसार, नेपाळच्या केंद्रीय बँकेकडून (Nepal Rashtra Bank) उपलब्ध आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ यापैकी पहिल्या आठ महिन्यात महागाईचा दर ७.१४ टक्के राहिला. हा दर गेल्या ६७ महिन्यांत सर्वाधिक आहे. अधिकारी, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पेट्रोलियम उत्पादने, खाद्य पदार्थांचे दर जागतिक स्तरावर वाढल्याने नेपाळमध्ये महागाई वाढली आहे. दुसरीकडे इतर देशांत राहणाऱ्या लोकांकडून नेपाळकडे येणाऱ्या पैशांत घट झाली आहे. अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलणाऱ्या पर्यटन क्षेत्रालाही कोरोना महामारीचा फटका बसला आहे. त्यामुळे परकीय चलन साठा झपाट्याने घटला आहे. ट्रेड अँड एक्स्पर्ट प्रमोशन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम उत्पादने देशातील सर्वात मोठ्या आयातीचा घटक आहे. नेपाळच्या एकूण आयातीत त्याचा १४ टक्के वाटा आहे. रेमिटेंस नेपाळसाठी परकीय चलनाचा मोठा स्त्रोत आहे. हा १.७ टक्क्यांनी घटून ६३१.१९ अब्ज रुपये झाला आहे. आयात वाढून रेमिटेंस घटल्याने परकीय चलन साठा घटला आहे. चालू आर्थिक वर्षात हा साठा १६.३ टक्क्यांनी घटून ११७१ अब्ज रुपये राहिला आहे. नेपाळला सध्या भारताकडून मदत मिळत आहे. चीनचा दबाव असुनही नेपाळने त्यांच्याकडून कर्ज घेण्यास नकार दिला आहे.