पिलीभीत : उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील निजामपूर गावात मादी बिबट्या आणि त्याचे पाच बछडे एका शेतात आढळल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस तोडणी बंद केली आहे. पिलीभीत टायगर रिझर्व्हच्या परिसरातील एका ऊसाच्या शेतात मादी बिबट्या आपल्या पिल्लांना घेऊन जाताना दिसून आले आहे. निजामपूरमधील ऊस खरेदी करणाऱ्या साखर कारखान्याने ३० एप्रिल रोजी गाळप हंगाम समाप्तीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना तत्पूर्वी ऊस तोडणीचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, बिबट्या शेतात असल्याने येथील शेतकरी ऊस तोडणीस धजावत नसल्याचे चित्र आहे.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मादी बिबट्या या शेतांमध्ये आपल्या पिल्लांसह वास्तव्य करून आहे. याबाबत बरेली विभागाचे मुख्य वन संरक्षक ललित वर्मा यांनी सांगितले की, ऊसाचे शेत आणि जंगल यामध्ये ५०० मीटरचे अंतर आहे. बिबट्या आपल्या पिल्लांना इतर जनावरांपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत असावी. अशा स्थितीत ऊस तोडणी धोकादायक आहे. मात्र, अशा स्थितीत नुकसान भरपाईची तरतुद वन विभागाकडे नाही. हे बछडे आणखी चार आठवडे येथेच असतील अशी शक्यता आहे. वन विभागाने त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.