शाहजहांपूर : जिल्ह्यात आता ड्रोनच्या माध्यमातून ऊसासह इतर सर्व पिकाची किड, रोगांपासून सुरक्षा होणार आहे. जिल्ह्यात सहकारी ऊस विकास समितींच्या माध्यमातून ड्रोन खरेदी करून त्यांच्या माध्यमातून पिकांवर पोषक तत्त्वे, किटकनाशके यांची फवारणी केली जाणार आहे. राज्याचे साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडून ड्रोन खरेदीचे प्रस्ताव मागवले आहेत. जिल्ह्यातून याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अप्पर मुख्य सचिवांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दोन्ही ऊस समित्यांनी याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने दूरसंचार क्षेत्रात टू जी तंत्रज्ञान सुरू झाले, आता फाईव्ह जी नेटवर्क सर्वत्र आहे. तशाच पद्धतीने जिल्ह्यात ऊस उत्पादनातील वाढीसाठी अनेक नव्या तंत्राचा वापर सुरू आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे यासाटी नव्या तंत्राने शेती करण्याची गरज आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर हा एक उत्तम पर्याय आहे. कारण यातून कमी कालावधीत आणि खर्चात मोठ्या क्षेत्रफळावर किटकनाशके, पोषक तत्त्वांचा वापर करणे शक्य होणार आहे. पिकांची देखभालही चांगल्या पद्धतीने करता येईल. एका ड्रोनची किंमत दहा लाख रुपये आहे. असे चार ड्रोन खरेदी केले जाणार आहेत.