नवी दिल्ली : देशात उष्णतेच्या लाटेने सर्व विक्रम मोडले आहेत. दिल्लीत शनिवारी दुपारी १२ वाजता तापमान ४१ डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद झाली. यासोबतच देशाच्या काही भागात कमाल तापमान ४७ डिग्रीपर्यंत पोहोचले. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे. यांदरम्यान हवामान विभागाचे (आयएमडी) संचालक डॉ. एम. महापात्रा यांनी देशातील हवामानाबाबत माहिती दिली आहे. भारतात तापमानाने १२२ वर्षांचा उच्चांक मोडल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत टीव्ही९हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, यावर्षी एप्रिल महिन्यात पश्चिम आणि मध्य भारतात सरासरी तापमान गेल्या १२२ वर्षात अनुक्रमे ३५.९० डिग्री सेल्सिअस आणि ३७.७८ डिग्री सेल्सिअससह सर्वाधिक आहे. देशाच्या पश्चिम – मध्य तसेच उत्तर – पश्चिम भारताच्या बहुतांश भागात तसेच उत्तर- पूर्व भारताच्या उत्तर विभागात तापमान अधिक राहील अशी शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात उत्तर-पश्चिम तसेच पूर्वोत्तर भारताच्या काही भागात सामान्य पाऊस कोसळेल. हा भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात सामान्य अथवा सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या ७२ वर्षात दुसऱ्यांदा दिल्लीत एप्रिल महिना इतका उष्ण राहीला आहे. येथे आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.