कानपूर : इंडोनेशियातील साखर कारखान्यांना उत्पादन वाढीसाठी मदत करण्यासाठी भारताने हात पुढे केले आहेत. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे एका शिष्टमंडळ इंडोनेशियातील साखर उद्योगातील तांत्रिक कर्मचाऱ्यांसोबत संयुक्त रुपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मेसर्स पॉलिटेक्निक पोर्कबुन एलएलपी (इंडोनेशिया) यांच्यासोबत सामंजस्य करार करारावर स्वाक्षरी करण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा करेल. मेसर्स पॉलिटेक्निक पोर्कबुन एलएलपीच्या विनंतीवर भारत सरकारकडून सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास आधीच मंजुरी देण्यात आली आहे.
प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, इंडोनेशियातील साखर कारखान्यांचे कामकाज बेंचमार्कपेक्षा खूप कमी आहे. या एमओयूतून साखर कारखान्यातील कामगारांच्या ज्ञानाचा स्तर वाढवण्याचा उद्देश आहे. याशिवाय त्यांना मानक प्रक्रिया, नवीन प्रक्रिया तंत्रज्ञान, ऊर्जा कौशल्य उपकरणांबाबत जागरुकता वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांनी सांगितले की, आम्ही उप उत्पादनांच्या योग्य वापराच्या महत्त्वाबाबतही त्यांना माहिती देऊ. त्यातून महसुलात वाढ होईल. या दौऱ्यावेळी संस्थेचे शिष्टमंडळ साखर कारखान्यांची पाहणी करून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची पडताळणी करण्यासाठी काही साखर कारखांन्यांना भेटी देईल. त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे.
इंडोनेशियातील साखर कारखान्यांतील योग्य मनुष्यबळाची कमतरता पाहता प्रस्तावित भेटीतून भारतीय विद्यार्थ्यांसाठी, खास करुन शुगर इंजिनीअरिंग, शुगर टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन, पर्यावरण विज्ञान आदी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होण्याची अपेक्षा आहे. संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजवर आधीच संधी मिळाली आहे. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, आम्ही इंडोनेशियाच्या साखर उद्योगावर ब्रँड इंडियाची छाप सोडण्याचे प्रयत्न करीत आहोत.