नवी दिल्ली : हवामान विभागाने देशाच्या एका भागात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे पावसाचे अनुमान वर्तवले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसनी चक्रीवादळाचा (Cyclone Asani) परिणाम १७ राज्यांमध्ये पाहायला मिळेल. या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतातील पू्र्व आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसासह ओरिसा, उत्तर पूर्व राज्यांत हवामान बदल पाहायला मिळेल तर दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये उष्णतेची स्थिती कायम असेल.
याबाबत इंडिया डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, आसनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यांत हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारसह १४ राज्यांत या चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने ८ मेपासून देशात उत्तर – पश्चिम तसेच मध्य भारतात उष्णतेच्या लाटेबाबतचे अनुमान जारी केले आहे. मध्य भारतात पुन्हा उष्णतेची लाट दिसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील तीन दिवसांत तापमान २-४ डिग्रीने वाढेल. तर ९-१२ मे या काळात राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर आणि मध्य प्रदेशात याचा परिणाम दिसेल. केरळ, कर्नाटक, कराईकल, तामीळनाडू, महाराष्ट्र आणि गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोरम, मणिपूर, मेघालयमध्ये ११ मे पर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.