नवी दिल्ली : भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या नियंत्रणात आहेत. देशभरात गेल्या एक महिन्यापासून इंधन दर सातत्याने स्थिर ठेवण्यात आले आहेत. इंडियन ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आज, १० मे रोजी सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. ७ एप्रिलपासून इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी २२ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत १४ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १०-१० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र आता हे दर नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये तर डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १२०.५१ आणि १०४.७७ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपये आणि डिझेल ९९.८३ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल, डिझेल अनुक्रमे ११०.८५ आणि १००.९४ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. राज्यस्तरावर व्हॅटच्या आकारणीचे दर वेगवेगळे असल्याने शहरांनिहाय दरात फरक पडतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या किमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दररोज दर निश्चित केले जातात. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात.