‘आसानी’ वादळ : जाणून घ्या कोणत्या दिशेने सरकतेय चक्रीवादळ, या राज्यांत सुरू आहे पाऊस

नवी दिल्ली : बंगालच्या खाडीच्या दिशेने सरकणाऱ्या आसानी या भयंकर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आणि रायलसीमा परिसरात बुधवारी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बंगालच्या खाडीत या वादळाचा जोर कमी झाला. बुधवारी सकाळी चक्रीवादळ मछलीपट्टणमपासून जवळपास ५० किलोमीटर दक्षिण-पूर्व, काकीनाडापासून १५० किमी दक्षिण-पश्चिम आणि विशाखापट्टणमपासून २९० किमी दक्षिण-पश्चिम अंतरावर केंद्रीत होते. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ दुपारपासून सायंकाळपर्यंत नरसापूर, यनम, काकीनाडा, तुनी आणि विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल. त्यानंतर रात्री ते उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून पश्चिम बंगालच्या खाडीकडे वळण्याची शक्यता आहे.

याबाबत दैनिक पंजाब केसरीने दिलेल्या वृत्तानुसार आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर काही भागात हलका पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आंध्र प्रदेशात ५५-६० किमी प्रती तास या वेगाने वारे वाहात आहे. बुधवारी हवेचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, कृष्णा, पूर्व आणि पश्चिम गोदावरी, पुद्दुचेरी, विशाखापट्टणम जिल्ह्यात हवेचा वेग ७०-८० किमी प्रती तास असू शकतो. नंतर गुरुवारी सकाळपर्यंत हवेचा वेग मंदावेल. किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून एनडीआरएफ, एसडीआरएफ टीमना अशा जिल्ह्यांत पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here