नवी दिल्ली : भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घातली आहे. निर्यात बंदी असलेल्या वस्तूंच्या यादीत याचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) शुक्रवारी अधिकृत नोटिफिकेशन दारी करून सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. निर्यातीसाठी ज्यांना १३ मे पूर्वी लेटर ऑफ क्रेडिट जारी केले आहे, त्यांना एक्स्पोर्टची परवानगी असेल. सरकारने खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रित करणे, अन्न सुरक्षा निश्चिती आणि गरजू शेजारील देशांसाठी हा निर्णय घेतला आहे.
याबाबत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकार ज्या देशांना अनुमती देईल, त्यांना गव्हाची निर्यात करता येईल. सरकार गरजू , विकासशील देशांच्या सरकारांच्या आधारावर याबाबत निर्णय घेईल. भारत सरकार शेजारील देश, अन्य विकासशील देशातील खाद्य सुरक्षेबद्दल कटिबद्ध आहे. जागतिक मार्केटमधील गव्हाच्या किंमतींत वाढ झाल्याने विपरित परिणाम या देशांवर झाले आहेत असे यात म्हटले आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारात गव्हाच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत.