कोलंबो : आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेत युरिया खतांची निर्यात बंदी असतानाही भारताने ६५,००० टन मेट्रिक टन युरिया पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत डेली मिररने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात श्रीलंकेच्या उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांनी भारताच्या खते विभागातील सचिव राजेश कुमार चतुर्वेदी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. मोरागोडा यांनी भारताच्या खते विभागाचे सचिव राजेश कुमार चतुर्वेदी यांची भेट घेतली. आणि श्रीलंकेला सध्याच्या हंगामासाठी गरज असलेल्या ६५,००० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्याच्या भारताच्या निर्णयाबाबत त्यांना धन्यवाद दिले.
डेली मिररच्या वत्तानुसार बैठकीत मोरागोडा आणि कुमार चतुर्देवी यांनी संभाव्य उपाययोजनांवर चर्चा केली. भारताकडून श्रीलंकेला रासायनिक खतांचा पुरवठा सध्याच्या क्रेडिट मर्यादेपलीकडे जाऊन सुरू राहू शकेल, त्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.
यापूर्वी श्रीलंका सरकारने जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या योजनेंतर्गत गेल्या वर्षी रासायनिक खतांच्या आयातीवर निर्बंध लागू केले होते. मात्र, जैविक खतांचा अपुरा पुरवठा असल्याने आणि आर्थिक संकट निर्माण झाल्याने कृषी उत्पादनावर खूप परिणाम झाला. सद्यस्थितीत श्रीलंकेला स्वातंत्र्यानंतर सर्वात खराब आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये इंधन, भोजनाचा तुटवडा, वाढत्या किमती, वीज कपात यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.