हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा
पुणे : चीनी मंडी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम नियमानुसार व्याजासह द्या, अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्व साखर कारखान्यांना दिली आहे. याबाबतचे लेखी पत्र कारखाना व्यवस्थापनाला पाठवण्यात आले आहे. तसेच एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम कारखान्याला दिली जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान, बफर स्टॉक अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान मिळणार म्हणून, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी आणखी थकवली आहेत. त्यामुळे या अनुदानाची वाट पाहत न बसता शेतकऱ्यांची देणी भागवा, अशा सूचनाही साखर आयुक्त गायकवाड यांनी केली आहे. विशेष म्हणजे केंद्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुरेश वशिष्ठ यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार साखर आयुक्तांनी पुढे कारखान्यांना पत्रे पाठवली आहेत.
केंद्राकडील अनुदानाची रक्कम ऊस पुरवठादारांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. पण, साखर कारखान्यांनी संबंधित ऊस पुरवठादारांना एफआरपीची रक्कम अदा केल्यास असे अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार नाही. असा परस्पर खुलासा साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांपुढे केला आहे. त्यावर केंद्र शासनाने साखर आयुक्तांना लेखी पत्राद्वारेच माहिती दिल्याने याबाबत अधिक स्पष्टता आली आहे. संबंधित कारखान्यांनी त्यांच्या ऊस पुरवठादारांना चालू व गेल्या हंगामातील थकीत बिले दिली, तर ऊस उत्पादकांना देण्यात येणारी रक्कम कारखान्याला दिली जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान मिळण्याआधी एफआरपी अदा केल्यास अनुदान मिळणार नसल्याचा खोटा प्रचार करू नये, असेही गायकवाड यांनी कारखान्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
एफआरपीची संपूर्ण रक्कम दिल्यास कारखान्यांना अनुदान मिळणार नसल्याच्या चुकीच्या प्रचाराबाबत केंद्रीय अन्न सचिवांना भेटून लक्ष वेधले होते, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. एफआरपीची रक्कम देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. अर्धवट रक्कम देऊ नये, यासाठी केंद्राने कारखान्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी साखर आयुक्तांकडे केल्याचेही खासदार शेट्टी यांनी सांगितले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp