बिजनौर : यंदा ऊस पिकावर गेल्या वर्षीच्या तुलनेत टॉप बोरर आणि कन्सुआ किडीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत किडीच्या प्रकोपामुळे जवळपास वीस टक्के पिकाचे नुकसान झाले आहे. रोपे खराब झाल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे किडीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्यांकडून उपाययोजना सांगितल्या जात आहेत.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धामपूर साखर कारखान्याच्या परिसरातील ५०० गावांतील ८० हजार शेतकरी ५२ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये ऊस पिकाचे उत्पादन करतात. या परिसरात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत टॉप बोरर आणि कन्सुआ किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे रोपे काळी पडली आहेत आणि पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी २० जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत
किटकनाशकाचा वापर करावा. पावसाळ्यात किटकनाशकाचा वापर करून काहीच फायदा होत नाही. साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी १५० मिली किटकनाशक ४०० लिटर पाण्यात मिसळून प्रती एकर फवारणी करावी. दुपानंतर हे औषध फवारावे. त्यानंतर पुढील २४ तासात शेताला पाणीपुरवठा करावा अशी सूचना देण्यात आल्या आहेत.