स्वराज क्रांती ग्रुप मझोला साखर कारखाना सुरू करणार

पिलीभीत : जवळपास १२ वर्षांपासून बंद पडलेला मझोला सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार स्वराज क्रांती ग्रुपला ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रुपच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील टीमने शनिवारी कारखाना आणि डिस्टिलरी परिसराची पाहणी केली. संध्याकाळी ऊस विकास तथा साखर कारखाना राज्यमंत्री संजय सिंह गंगवार यांची भेट घेऊन मझोला साखर कारखाना सुरू करण्याच्या संभाव्य शक्यतांबाबत माहिती दिली. या टीमने जवळपास ६०० कोटी रुपये खर्चून नवा शुगर प्लांट सुरू करण्याची चर्चा केली आहे. यात साखरेसह डिस्टिलरी, वीज उत्पादन प्लांट असेल. नव्या प्लांटची स्थापना दीड वर्षात होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकार क्षेत्रातील हा कारखाना सतत सुरू राहिलेल्या तोट्यामुळे २०१० मध्ये बंद करण्यात आला होता. त्यानंतर हा राजकीय मुद्दा बनला. समाजवादी पक्षाच्या सरकारने कारखाना सुरू करण्याविषयी घोषणाही केली. मात्र, हा प्रस्ताव फाईलमध्ये अडकला. भाजपच्या सरकारमध्ये आमदार संजय सिंह गंगवार यांनी यासाठी प्रयत्न केले. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी यांनी विधानभा निवडणुकीवेळी या कारखान्याविषयी घोषणाही केली होती. ऊस विकास राज्यमंत्री संजय सिंह गंगवार यांनी मझोला कारखाना सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री योगी यांचीही अनेकदा भेट घेतली. त्यानंतर स्वराज क्रांती ग्रुपला ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कारखान्यात दररोज ७० हजार क्विंटल ऊस गाळप होऊ शकते असे सांगण्यात आले. यावेळी टीममध्ये सहभागी ग्रुपचे प्रमुख धनंजय सिंह, एस. के. जडिया, प्रभाकर मिश्रा, एस. के. गौड, राजीव गंगवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here