नवी दिल्ली : मान्सूनपूर्व काळातील घडामोडी वाढल्याने देशातील काही राज्यांत पावसाची शक्यता आहे. दक्षिण-पश्चिम मान्सून श्रीलंकेच्या दिशेने सरकून तो केरळच्या दिशेने आला आहे. यांदरम्यान अनेक राज्यांत पावासाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीने १६ मे रोजी अंदमान आणि निकोबार द्विपकल्पावर मान्सूनच्या सुरुवातीची घोषणा केली होती. मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि लक्षद्विपच्या काही भागात पुढे सरकला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (India Meteorological Department) अधिकारी आर. के. जेनामणी यांनी सांगितले की, मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती आहे. केरळमध्ये एक – दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर स्कायमेट वेदरने (skymet weather) दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप आणि कोमोरिन क्षेत्राच्या काही भागात दक्षिण-पश्चिम मान्सून पुढे सरकरण्यासारखी स्थिती आहे.
एशियननेट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, स्कायमेट वेदरने सांगितले की, पुढील २४ तासात पूर्वोत्तर भारत, तामीळनाडू, केरळ, लक्षद्विप, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम हिमालय आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. IMDने सांगितले की, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि तेलंगणा तसेच आंध्र प्रदेशच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वोत्तर भागात, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणातील काही भागात हलका पाऊस कोसळेल.