नवी दिल्ली : भारतात ६ जून २०२२ पर्यंत ३५२.३७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत ३०७.४१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. या हंगामातील साखर उत्पादनाचा विचार केला तर ISMA ने आपले अखिल भारतीय साखर उत्पादनाच्या २०२१-२२ साठीच्या अनुमानात ३६० लाख टनापर्यंत (इथेनॉल उत्पादनाकडे ३४ लाख टन साखर वळविल्यानंतर) सुधारणा केली आहे. गेल्यावर्षी भारताने इथेनॉल उत्पादनासाठी जवळपास २० लाख टन साखर वळविल्यानंतर ३११.९२ लाख टन साखर उत्पादीत केली होती.
साखर निर्यातीसाठी आतापर्यंत ९४-९५ लाख टनाचे करार करण्यात आले आहेत. यापैकी जवळपास ८६ लाख टन साखर मे २०२२ च्या अखेरपर्यंत भौतिक रुपात निर्यात झाली आहे. अलिकडेच सरकारने चालू हंगामासाठी साखर निर्यात १०० लाख टनापर्यंत मर्यादीत केली आहे. एप्रिल २०२२ च्या अखेरपर्यंत साखर विक्री गेल्या वर्षीच्या १६०.०५ लाख टनाच्या तुलनेत १५२.६१ लाख टन होण्याचा अंदाज आहे. ISMAच्या म्हणण्यानुसार, चालू हंगामात देशांतर्गत साखरेचा खप २७५ लाख टन असेल. तर गेल्या वर्षी हा खप २६५.५५ लाख टन होता.
भारतीय साखर उद्योगासाठी इथेनॉलला स्पष्टपणे गेम-चेंजर म्हटले जात आहे. १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट आधीच गाठले गेले आहे. खरेतर मुदतीआधी ५ महिने इथेनॉल मिश्रणाचे धेय्य भारताने गाठले आहे. पेट्रोलमध्ये उच्च इथेनॉल मिश्रण करून ४१,००० कोटी रुपयांच्या विदेशी चलनाची बचत झाली आहे. भारताने २०२५ पर्यंत २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ठपूर्तीसाठी परिश्रम सुरू केले आहेत.
ईटी नाऊसोबत एका खास मुलाखतीत ISMAचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सांगितले की, देशाकडे सद्यस्थितीत पुरेशी साखर आहे. ते म्हणाले की, आपण २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.