पुणे : इथेनॉल उत्पादन हा साखर उद्योगातील टर्निंग पॉईंट आहे. देशासमोरल ऊर्जेच्या संकटावर या ऊस उद्योगातून मार्ग काढणे शक्य आहे. इथेनॉल इंधन, सहवीज निर्मिती, ग्रीन सीएनजी, ग्रीन हायड्रोजनसह प्रेसमड, बायोकंपोस्ट या गोष्टी भविष्यात साखर उद्योगाला ऊर्जा केंद्रे बनवतील असे प्रतिपादन साखर उद्योगातील तज्ज्ञ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (WISMA) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्यावतीने नुकतेच पुण्यात आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेत बोलताना ठोंबरे यांनी साखरेच्या पलीकडे या विषयावरील आपल्या संकल्पना मांडल्या. इथेनॉल, बायो सीएनजी, ग्रीन हायड्रोजन हे तीन पर्याय निवडले तर हा साखर उद्योग हंगामी न राहता वार्षिक होईल आणि साखर उद्योग स्वावलंबी बनेल, असे ठोंबरे म्हणाले.
बी. बी. ठोंबरे म्हणाले की, साखर उद्योगाची मुलभूत संकल्पना बदलतेय. पूर्वी हा उद्योग ज्या पद्धतीने फक्त साखरच उत्पादन करीत होता. आता त्या पलिकडे जाण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ब्राझीलमधील दुष्काळ, थायलंडमधील परिस्थितीने भारतीय साखरेला जगाची खूप मोठी बाजारपेठ मिळाली. यंदा आपण विक्रमी ३५५ लाख टनाहून अधिक साखर उत्पादन घेतले आहे. तरीही कारखान्यांची गोडाउन रिकामी आहेत. कारण जवळपास १०० टन साखर निर्यात होत आहे. त्यातून कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले.
ठोंबरे यांनी सांगितले की, कारखान्यांना साखर उत्पादनाकडून इथेनॉल उत्पादनाकडे वळवणे हा टर्निंग पॉइंट आहे. आता उसाची परिभाषा एनर्जी केन अशी बनत आहे. साखर कारखाने ऊर्जा केंद्रे बनत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारचे इथेनॉल प्रकल्पाला प्रोत्साहन मिळत आहे. आता फक्त सी मोलॅसिस पुरेसे ठरणार नाही. इथेनॉल उत्पादनाची आताच ४१० कोटी लिटरची गरज आहे. केंद्राने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी करण्यासाठी सी मोलॅसीस बेसवर थांबून चालणार नाही. आता बी हेवी मोलॅसीस, सिरप, ज्युस टू इथेनॉल या संकल्पना वापराव्या लागतील. आम्ही विस्मा आणि साखर संघातर्फे केंद्राकडे विनंती करीत आहोत. ज्या कारखान्यांकडे डिस्टिलरी आहे, ते बी हेवी मोलॅसीसपर्यंत पोहोचले. मात्र, ज्यांच्याकडे डिस्टीलरी नाही, त्यांच्याकडून सी हेवी मोलॅसीस उत्पादन सुरू आहे. इथेनॉल उत्पादनावर भर देण्यासाठी सी हेवी मोलॅसीस बंद करून फक्त बी हेवी मोलॅसीसपर्यंतच परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे.
ठोंबरे यांनी सांगितले की, साखर उद्योगात इथेनॉल प्रकल्प उभारणी अपरिहार्य आहे. हे लक्षात घेऊन
बी मोलॅसीसवर भर द्यावा. याशिवाय शुगर सिरप इथेनॉलसाठी दर वाढवून मिळावा अशी आमची मागणी आहे. कारखाने आता जे साखर उत्पादन करणार आहोत, त्यांनी त्यातील २५ टक्के उसापासून थेट सिरप निर्मिती करायला हवी. याशिवाय, बायो सीएनजी निर्मिती करणे शक्य. कारखान्यांना ५०,००० एम ३च्या प्रकल्पातून ६००० एमटी सीएनजी उत्पादन शक्य आहे. यातून ३० कोटी रुपयांचा नफा मिळू शकतो असे ठोंबरे यांनी सांगितले.