सहारनपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचा फटका उसाच्या शेंड्याला अधिक बसल्याचे दिसून येतो. त्यामुळे उसाच्या रोपाची वाढ खुंटते. हलक्या पावसानंतर थंड वातावरणात हा रोग गतीने पसरतो. त्यामुळे पिकाची उत्पादकता कमी होते. ऊसाच्या कोशा ०२३८ या प्रजातीवर याचा फैलाव अधिक दिसून येत आहे.
अमर उजालामधील वृत्तानुसार, ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. जिल्ह्यात हलगोवा, अहमदपुर, बिड़वी, रणमलपुर, उमरी खुर्द, उमरी कला आदी गावात उसावर या रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. या रोगाचा फटका बसलेल्या उसावर तीन प्रकारची लक्षणे दिसतात. सुरुवातीच्या काळात या रोगाने उसाची पाने पिवळी पडतात. त्यानंतर ही पाने वाळायला सुरुवात होते. रोपाच्या कोंबातील पाने इतर पानांपेक्षा छोटी राहतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर असा ऊस पिवळा, लालसर आणि चाकूने कापल्यासारखा दिसतो. हवेतून हा रोग अधिक गतीने पसरतो. २० ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान आणि ७० ते ८० टक्के आर्दता या रोगाला पसरण्यासाठी अनुकूल असते. वेळेवर उपाययोजना केली नाही तर पिकाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.