अलंगनल्लूर साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आढाव्यासाठी समिती स्थापन

मदुराई : अलंगनल्लूर साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती, राज्याचे कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री एम. आर. के. पनीरसेल्वम यांनी दिली. अलंगनल्लूर येथे आयोजन करण्यात आलेल्या शेतकरी संघटना, कारखाना कामगार आणि अन्य हितधारकांच्या बैठकीत मंत्री पनीरसेल्वम बोलत होते.

या बैठकीला वाणिज्य कर व नोंदणी मंत्री पी. मूर्ती उपस्थित होते. मंत्री पनीरसेल्वम यांनी सांगितले की, कारखाना योग्य पद्धतीने चालविण्यासाठी प्रतीदिन सरासरी २५०० टन उसाची गरज आहे. २०१९ मध्ये उसाच्या कमतरतेमुळे कारखाना बंद करण्यात आला. त्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांना कारखान्याची पूर्ण पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकार साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी सर्व बाबींची पूर्तता केली जाईल.

मंत्री मूर्ती म्हणाले की, साखर कारखान्याला यापूर्वी २००३-२००५ या कालावधीत अडचणींचा सामना करावा लागला होता. २००६ मध्ये सरकारने कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली होती. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी जर सहकार्य केले तर कारखाना लवकरात लवकर सुरू होवू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here