हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
साखरेला मागणी कमी असल्याने किमान विक्री किमतीच्याही (एमएसपी) खाली विक्री करून महाराष्ट्रातील साखर कारखाने शेतकऱ्यांची थकीत देणी भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी कारखाने बिले मात्र किमान विक्री किमतीचीच करत आहेत आणि साखर खरेदी करणाऱ्या रोखीने थोडे पैसे परत देत आहेत. कायद्यानुसार किमान विक्री किमतीच्याही खाली साखर विक्री करणे गुन्हा आहे. त्यामुळे सरकारला कोणत्याही परिस्थितीत या प्रकाराचा सुगावा लागू नये, यासाठी कारखान्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, ‘आम्हालाही काही कारखाने किमान विक्री किमतीच्या खाली साखरेची विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहे. हे खरच वाईट आहे. साखर खरेदी करणाऱ्याला कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. जर, सरकारने या संदर्भात चौकशी सुरू केली तर, हे साखर कारखाने अडचणीत येतील.’
मुळात शीतपेये, आईस्क्रीम सारख्या औद्योगिक क्षेत्रातून साखरेला फारशी मागणी नसल्यामुळे साखर कारखाने सध्या अडचणीतून जात आहेत. त्यामुळेच सरकारने साखरेचा किमान विक्री दर दोन रुपये प्रति किलोने वाढवला आहे. अतिरिक्त पुरवठा असल्यामुळेच घाऊक बाजारात साखरेच्या किमती या किमान विक्री दरापेक्षा थोड्या वरचढ आहेत.
गेल्या हंगामात फेब्रुवारीअखेर महाराष्ट्रात ७४ लाख ७० हजार टन साखर उत्पादन झाले होते. यंदा याच काळातील उत्पादनाचा आकडा ८३ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने व्यक्त केली आहे. राज्यातील काही साखर कारखान्यांमधील गाळप बंद झाले आहे. काही कारखान्यांनी गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच गाळप सुरू केल्याने ते लवकर बंद होत आहेत.
याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ म्हणाले, ‘जरी कारखाने किमान विक्री किमतीच्या खाली साखर विक्री करत असले तरी, कारखाने बिले त्या किमतीला करत नसल्याने त्यांचा छडा लावणे अशक्य आहे. जरी त्यांनी ३० रुपये किलो दराने बिल केले तरी, ते १ रुपयानुसार उर्वरीत रकमेचा पुढच्या तारखेचा चेक दाखवू शकतात. कारखान्यांनी हा प्रकार तातडीने थांबवला पाहिजे.’ साखर उद्योगाच्या मागणीनंतरच सरकारने किमान विक्री किंमत वाढवली आहे. त्यामुळे साखर उद्योगाने सरकारच्या निकषांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन खटाळ यांनी केले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp