लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर सर्टिफिकेट वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऊस खरेदी-विक्रीतील माफियांवर जोरदार हल्लाबोल केला. ५०.१० लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर सर्टिफिकेट वितरण कार्यक्रमात त्यांनी देशात सहकार आंदोलनाचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, अन्नदाता शेतकऱ्यांविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे. मुख्यमंत्री योगी यांनी आधीच्या सरकारांवर शेतकऱ्यांविषयी केवळ घोषणा केल्याबद्दल जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आधीची सरकारांनी एकतर्फी निर्णय घेतले. ते फक्त स्वतःचा फायदा पाहात होते. त्यांना ना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहिले, ना साखर कारखान्यांचे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अन्नदाता शेतकऱ्याचा एक पैसाही कोणी लुटू नये यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने ई-पर्चीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा दिला आहे. ऊस माफियांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. पाचट जाळण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, राज्यात बायोफ्यूएल उत्पादनासाठी नवे उद्योग आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळण्याची वेळ येणार नाही. केंद्र सरकार देशात मोठ्या प्रमाणावर बायोफ्यूएल उद्योगांसाठी प्रयत्न करीत आहेत. आता उसाच्या प्रत्येक भागात काही ना काही उत्पादन निर्मितीसाठी वापर होत आहे. साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढले आहे, असे योगी म्हणाले.