लखनौ : उत्तर प्रदेश आता इथेनॉल उत्पादनासाठी प्रमुख हबच्या रुपात विस्तारले आहे. आणि इथेनॉल मिश्रण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत राज्य देशातील अन्य राज्यांतील इंधन डेपोंना इथेनॉलचा पुरवठा करीत आहे, असे प्रतिपादन अबकारी राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) नितीन अग्रवाल यांनी केले. लोक भवनमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ११५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले होते. यावर्षी वार्षिक इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट १४० कोटी लिटर आहे. ते म्हणाले की, राज्यात १०० दिवसांमध्ये ४५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात येणार होते. त्याच्या तुलनेत ४५.१७ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. अशा प्रकारे १००.४ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. ते म्हणाले की, इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाच्या सफलतेने परकीय चलनाची बचत होईल. इथेनॉलचा जीएसडीपीमध्ये जवळपास २,२२१.४५ कोटी रुपयांचे योगदान असेल.
मंत्री अग्रवाल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार अबकारी विभागाने निर्धारित वेळेत उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अबकारी विभागाने १०० दिवसांचा रोडमॅप तयार केला आहे. त्याअंतर्गत तीन डिस्टिलरी उभारणी करण्यात येणार आहेत. तिन्ही युनिट्स रेडिको खेतान लिमिटेड सीतापूर, करीमगंज बायोफ्यूएल मुरादाबाद आणि क्रिस्टल बालाजी मुजफ्फरनगरला डिस्टिलरी स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ७९३.३७ कोटी रुपयांची गुंतवणूक असेल. आणि ३,६०० नवे रोजगार निर्माण होतील.