इस्लामपूर : महाराष्ट्रातील साखर हंगामात ऊस वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर बैलगाड्यांचा वापर केला जातो. अशावेळी शेतात ऊस भरताना तसेच वाहतुकीवेळी काहीवेळा अपघात घडतात. बैलांवर अतीभार येऊन वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. इस्लामपूरच्या आर.आय.टी. महाविद्यालयातील ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर पर्याय शोधला आहे. विद्यार्थ्यांनी कॅपस्टन प्रोजेक्टअंतर्गत बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट तयार केला आहे. त्यातून बैलगाडी वाहतुकीवेळी येणाऱ्या अडचणींवर मात केली जाणार आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी गाळप हंगामात सहकारी आणि खासगी अशा २०० कारखाने ऊस वाहतूक करतात. प्रत्येक कारखान्याकडे सरासरी ३०० बैलगाड्या असतात. बैलगाडीत शेतात ऊस भरताना लावलेला लाकडी सपोर्ट जमिनीत धसणे व मोडणे, बैलांवर अतिभार, रस्त्यांवरील स्पीडब्रेकर तसेच खड्यांमुळे बैलांचा पाय घसरणे, पाय मुरगळणे व कधीकधी पाय मोडणे अशा समस्या येतात. बैलांना दुखापत होऊन बैल मालकाचे आर्थिक नुकसान होते. हा विचार करून ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्टअंतर्गत ऊस वाहतुकीतील बैलगाड्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत केले. यााठी सारथी प्रोजेक्टअंतर्गत त्यांनी बैलगाडीला काही सपोर्ट सिस्टीम तयार करता येईल का यावर विचार केला. जवळील राजारामबापू सहकारी साखर कारखाना, राजारामनगरसाठी होत असलेल्या ऊस वाहतुकीत बैलगाड्यांची पाहणी केली व अनोखी संकल्पना राबवली. डॉ. सुप्रिया सावंत यांनी प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्यांनी दोन्ही बैलांच्या मध्ये तिसरे चाक बसवले, जे बैलांवरील भार कमी करते. या चाकामुळे बैलगाडीचे संतुलन राहते. बैलांच्या उंचीनुसार हा रोलिंग सपोर्ट कमी-जास्त आणि वर-खाली केला जाऊ शकतो. ऊस भरताना खाली व शेतातून वाहतूक करताना वर अडकवू शकतो. ऊस भरताना व रस्त्यावरून वाहतूक करताना प्रोजेक्टचे टेस्टिंग करण्यात आले आहे. या प्रोजेक्टचे प्रायोगिक तत्त्वावर येणाऱ्या गळीत हंगामात अंमलबजावणी करण्यास प्रयत्न केले जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या रिसर्च निधी अंतर्गत प्रोजेक्टसाठी १०,००० रुपये निधी मिळाला आहे. रोलिंग सपोर्ट प्रोजेक्ट पेटेंटसाठीही अर्ज करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रा. पी. एस. घाडगे व ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. एस. आर. कुंभार यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ए. बी. काकडे, डॉ. एल. एम. जुगुलकर, प्रा. सुधीर आरळी आणि प्रा. हर्षल पाटील, कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आर. डी. सावंत व गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन भगतसिंह पाटील यांनी या टीमचे कौतुक केले.