महाराष्ट्र: आयएमडीचा ५ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी पावसाचा जोर वाढणार असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळी आयएमडीने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यासाठी काही ठिकाणी हलक्या ते तीव्र पावसाचा अंदाज वर्तविला. मुंबईसह उपनगरात पुढील २४ तासांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअर तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील असे अनुमान आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. आयएमडीने आजपासून मध्य महाराष्ट्र तीव्र पावसाची शक्यता वर्तवली आहे. १२ ते १४ जुलै यांदरम्यान, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत ४५- ते ५५ किलोमीटर प्रतीतास आणि ६५ किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहतील. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. मान्सुनच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १ जून पासून १० दुलैपर्यंत ७६ जणांचा पावसाने मृत्यू झाला आहे. तर पावसामुळे ८३९ घरे कोसळली आहेत. आतापर्यंत ४,९१६ जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पुनर्वसन विभागाने ३५ मदत शिबिरे सुरू केली आहेत. एक जूनपासून सुरू झालेल्या पावसात १२५ जनावरे, प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास या नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या स्तराजवळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here