साओ पाउलो : ब्राझीलच्या मध्य-दक्षिण क्षेत्रात ऊस गाळप जून अखेरपर्यंत बाजारपेठेच्या अपेक्षेच्या तुलनेत कमी झाले आहे, असे Unica उद्योग समुहाकडील आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. यासोबतच साखर उत्पादनात गेल्यावर्षीपेक्षाही घट झाली आहे. कारण, साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत एकूण ४१.८७ मिलियन टन गाळप झाले आहे. हे गाळप गेल्या एक वर्षाच्या तुलनेत ७.९ टक्क्यांनी कमी आहे. तर एसअँडपी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सच्या (S&P Global Commodity Insights) अहवालात गाळप ४२.६३ मिलियन टनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा विश्लेषकांनी व्यक्त केली होती.
या कालावधीत साखर उत्पादन १४.९८ टक्के घसरुन २.४८ मिलियन टनापर्यंत पोहोचले आहे. तर मक्क्यासह बनलेल्या इंधनासह इथेनॉल उत्पादन ३.९ टक्के घटून २.०२ बिलियन लिटर झाले आहे. एसअँडपी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सनुसार अभ्यासकांनी साखर उत्पादन २.५ मिलियन टन आणि ऊसावर आधारित इथेनॉल उत्पादन १.९८ बिलियन लिटर होईल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र स्थानिक कारखान्यांनी यावर्षी आतापर्यंतच्या जैव इंधनाच्या उच्च किमतीचा लाभ उचलण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. मात्र, एसअँडपीच्या माहितीनुसार, आता कारखाने ऊसाचा बहुतांश हिस्सा साखरेसाठी वापरतील अशी अपेक्षा आहे.