नवी दिल्ली : अपेक्षेनुसार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली आहे. अमेरिकेच्या या केंद्रीय बँकेने व्याज दरात ०.७५ टक्के वाढ केली आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याज दरात वाढ करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे बँकांना व्याज दरवाढीसाठी मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, व्याज दरवाढीच्या या निर्णयाचा भारतावरही परिणाम होणार आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीचा परिणाम भारतीय रुपयावरही होईल. त्यामुळे रुपया आणखी घसरण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत आधीच रुपया ८० रुपये प्रती डॉलरच्या स्तरावर आला होता. अशा स्थितीत अमेरिकेच्या या निर्णयाने भारतासमोरील अडचणी वाढतील अशी शक्यता आहे. आता आगामी ३ ते ५ ऑगस्ट यांदरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर आरबीआय क्रेडिट पॉलिसीची घोषणा करेल. या वेळीही आरबीआय दरवाढ करेल अशी दाट शक्यता आहे. यामागे फेडरल रिझर्व्हचे कारण मानले जात आहे. जर आरबीआयने रेपो रेटसह इतर दर वाढवले तर देशातील बँकांकडूनही कर्ज दरात वाढ करावी लागले. त्याचा थेट परिणाम लोकांना कर्जाच्या हप्त्यावर होणार आहे. फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरवाढीमुळे भारताच्या आयात खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.