मुंबई : महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाला यंदा जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून ६ लाखांहून अधिक लोकांच्या ३.८० लाख हेक्टरमधील पिके उध्वस्त झाली आहेत. बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने आपल्या प्राथमिक सर्व्हेनंतर ही माहिती दिली आहे. मराठवाडा विभागातील औरंगाबाद, बिड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांत महसूल विभागाने आतापर्यंत १ लाख ७३ हजार ७१७ हेक्टर जमिनीवरील सर्व्हे केला आहे. पूरग्रस्त क्षेत्राच्या तुलनेत हे क्षेत्र ४५.८५ टक्के आहे.
हिंदी मनीकंट्रोल डॉट कॉमवरील वृत्तानुसार, औरंगाबाद विभागाच्या आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, या वर्षी या भागात ४६२.३ मिलिमिटर पाऊस झाला आहे. दरवर्षी सरासरी २९६.२ मिमी पाऊस या भागात होतो. २६ जुलैपर्यंत सामान्यच्या तुलनेत १५६.०८ टक्के जादा पाऊस झाला आहे. अहवालात म्हटले आहे की, प्राथमिक सर्व्हेनुसार या आठ जिल्ह्यांत पाऊस, पुरामुळे ३ लाख ७८ हजार ८६६.१९ हेक्टर जमिनीवरील ६.२३ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक नुकसानीचा फटका बसला आहे. पुराच्या घटनांमध्ये ६६० जनावरांचा मृत्यू झाला आहे. १८२ मंडलांना पुराचा फटका बसला आहे. वीज कोसळून २५ जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे.