नवी दिल्ली : महाराष्ट्रात यावर्षी सुद्धा मागील हंगामाप्रमाणे ऊस तोडणी मजुरांची कमतरता भासणार आहे. त्यामुळे ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे अनुदान देण्याची योजना पूर्ववत करावी, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा ऊस गाळप हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मागील हंगामामध्ये ऊस तोड मजूरांची फार मोठ्या प्रमाणात कमतरता भासल्याने गाळप हंगाम एक ते दिड महिना लांबला होता. ऊस गाळप हंगामास विलंब झाल्याने साखर उताऱ्यावर फार मोठा विपरीत परिणाम होवून आर्थिक नुकसान झाले होते. राज्यात यावर्षीसुध्दा मागील हंगामाप्रमाणेच ऊस तोड मजूरांची कमतरता भासणार आहे. त्यासाठी ऊस तोडणी यंत्राची (Sugarcane harvester) मोठ्या प्रमाणात उपलब्धता करावी लागणार आहे. यापूर्वी केंद्र शासनाकडून ऊस तोडणी यंत्राची खरेदी करण्यासाठी अनुदान मिळत होते. परंतु आता केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान बंद झाले असल्याने सदर ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याकरीता राज्य शासनाकडून अनुदान मिळणे क्रमप्राप्त झाले आहे. राज्य शासनाकडून ऊस तोडणी यंत्रास मागील प्रमाणेच ५० टक्के अनुदानावर म्हणजेच रुपये ५० लक्ष प्रती यंत्र मंजूर करण्याची आवश्यकता आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, याबाबत वेस्ट इंडीयन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार यावर्षीच्या गाळप हंगामाकरीता ऊस तोडणी यंत्र उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते निर्देश संबंधितांना देण्यात यावेत अशी विनंती मंत्री गडकरी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.