उत्तर प्रदेशात पाऊस कमी, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू : मुख्यमंत्री आदित्यनाथ

लखनौ : राज्यात पाऊस कमी झाला असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार सर्वतोपरी मदत केली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्र्यांनी पिकांच्या पेरणी आणि पावसाच्या स्थितीचा आढावा घेताना अधिकाऱ्यांना २४ तास सर्व जिल्ह्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की, १५ जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे पेरणीवर परिणाम झाला असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, योगी आदित्यनाथ म्हणाले की, कृषी, पाटबंधारे, महसूल, मदत आणि इतर संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. यावर्षी ३१ जुलैपर्यंत राज्यात १९१.८ मिमी पाऊस पडला आहे, तर २०२१ मध्ये ३५३.६५ मिमी आणि २०२० मध्ये ३४९.८५ मिमी पाऊस झाला आहे. आग्रा हा एकमेव जिल्हा आहे जिथे सरासरीपेक्षा जास्त (१२० टक्के) पाऊस झाला आहे. योगी म्हणाले की, अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार सर्वतोपरी मदत केली जाईल आणि एकाही शेतकऱ्याची गैरसोय होऊ दिली जाणार नाही. दरम्यान, यंदा फिरोजाबाद, एटा, हाथरस, लखीमपूर खेरी, औरैया, चित्रकूट, प्रतापगड, वाराणसी आणि हापूर जिल्ह्यांमध्ये सामान्य (८० ते १२० टक्के) पाऊस पडला, असे निवेदनात म्हटले आहे.

योगी म्हणाले की, कानपूर, अमरोहा, मुरादाबाद, गोंडा, मऊ, बहराइच, बस्ती, संत कबीरनगर, गाझियाबाद, कौशांबी, बलिया, श्रावस्ती, गौतम बुद्ध नगर, शाहजहांपूर, कुशीनगर, जौनपूर, कानपूर देहाट, फारुखाबाद आणि रामपूर येथे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here