औरंगाबाद : राज्यात ऊस गाळप हंगाम यावर्षी १ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ऊस गळीत हंगाम नेहमी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत सुरू राहतो. मात्र, २०२१-२२ या हंगामात उच्चांकी पिकामुळे गाळप प्रक्रिया मे अखेरपर्यंत सुरू राहिली होती. राज्याने २०२१-२२ या हंगामात १३७.२८ लाख टन उसाचे उत्पादन करून उच्चांक गाठला आहे. यामध्ये एक वर्ष आधीच्या तुलनेत जवळपास ३१ लाख टन अधिक साखर उत्पादन झाले होते.
गेल्या हंगामाप्रमाणेच आगामी हंगामातही महाराष्ट्रात उच्चांकी ऊस आणि साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. साखर आयुक्तालयाच्या अंदाजानुसार, आगामी हंगामात १३८ लाख टन साखरेचे उत्पादन होईल. आणि जवळपास १२ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी डायव्हर्ट केली जाईल. राज्यातील ऊस क्षेत्र वाढून १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टर झाल्याचे अनुमान आहे. प्रती हेक्टर ९५ टनाच्या सरासरी उत्पादनानुसार हंगामासाठी एकूण १४१३ लाख टन ऊस उपलब्ध असेल. साखरेचा सरासरी उतारा ११.२० टक्के गृहित धरला तर १५० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.