पुणे : महाराष्ट्रात सलग दोन वर्षांपासून ऊसाचे उच्चांकी उत्पादन नोंदवण्यात आले आहे. आणि गेल्यावर्षी तर गळीत हंगाम दीर्घकाळ सुरू राहिला होता. राज्यातील सर्व साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांना कामगारांच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता. तोडणी मजुरांच्या टंचाईच्या समस्येपासून बचावासाठी यावर्षी ऊस तोडणी मशीन खरेदी करण्याची मानसिकता वाढत आहे. सद्यस्थितीत ऊस तोडणीचे हार्वेस्टर खरेदीसाठी कोणतेही अनुदान दिले जात नाही. मात्र, तरीही शेतकऱ्यांचा गट अथवा व्यक्तीगत शेतकऱ्यांकडून हार्वेस्टर खरेदीसाठी कंपन्यांकडे चौकशी करीत आहेत. गेल्या वर्षी ६० ते ७० मशीन खरेदी करण्यात आली होती. जर राज्य सरकारने मशीन खरेदीसाठी अनुदान दिले तर याची विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सद्यस्थितीत राज्यातील विविध साखर कारखान्यांकडील ६०० हून अधिक हार्वेस्टर ऊसाची तोडणी करत आहेत. गेल्या दहा वर्षात अनेक कंपन्यांनी दरवर्षी हार्वेस्टरमधील त्रुटी दूर करून मशीन बाजारात सादर केली आहेत. त्यामुळे आता यंदा मशीनची विक्री आणखी वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या हंगामात मराठवाड्याला मोठा फटका बसला होता. मात्र उसाची तोडणी बंद झाली नव्हती. पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी आपल्याकडील हार्वेस्टर मशीन मराठवाड्यात पाठवून हंगाम समाप्त करण्यासाठी प्रयत्न केले. मशीनमुळे अनेक ठिकाणी ऊसाची चांगली तोडणी झाली आहे. हा अनुभव लक्षात घेऊन कंपन्यांनी आता मुख्यत्वे मराठवाड्यातील लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत तोडणी मशीनबाबत चौकशी करीत आहेत. हार्वेस्टरची किंमत एक कोटी ते दीड कोटी रुपयांपर्यंत असते. अनुदान नसल्याने अनेक शेतकरी एकत्र येऊन ऊस तोडणी हार्वेस्टर खरेदी करण्याची तयारी करीत आहेत.