अमेरिका आणि चीन यांदरम्यान निर्माण झालेला तणाव आणि गुंतवणूकदारांवर मायक्रो इकॉनॉमिक डेटाचा झालेला परिणाम यामुळे गुरुवारी भारतीय बाजारात सुरुवातीच्या सत्रात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३६ पैशांनी खालावून ७९.५३ रुपयांवर आला. बाजारातील त्याची सुरुवात ७९.२३ वर झाली होती. इंटर बँकिंग परकीय चलन बाजारात रुपयाची ओपनिंग ७९.२३ वर झाली, मात्र लगेच त्यामध्ये ३६ पैशांची घसरण झाली. बुधवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ६० पैशांनी खालावून ७९.१७ या स्तरावर बंद झाला होता. चालू आर्थिक वर्षातील एका दिवसात ही मोठी आर्थिक घसरण आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत असलेला डॉलर निर्देशांक ०.०८ टक्क्यांनी घसरून १०६य४१ वर आला. बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर ०.२४ टक्क्यांनीवाढून प्रती बॅरल ९७.०१ डॉलरवर पोहोचले आहे. व्यापार तुटीचे वाढलेले आकडे आणि डॉलरची प्रचंड मागणी यामुळे रुपया कमजोर राहील. व्यापार्यांना अमेरिका-चीन तणावाचा धोका सतावत आहे असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले. भारताच्या निराशाजनक मायक्रो इकॉनॉमिक डेटामुळे रुपयावर दबाव वाढला आहे असे अभ्यासकांनी म्हटले आहे.