भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षाही गतीने विकास करेल. मॉर्गन स्टॅनलीने याबाबत आपल्या अहवालात म्हटले आहे की, २०२२-२३ मध्ये अर्थव्यवस्था संपूर्ण आशियात सर्वाधिक गतीने विकास करेल. सध्याच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ७ टक्के राहील असेही मॉर्गन स्टॅनलीने म्हटले आहे. इतर अर्थव्यवस्थांमध्ये ही विकासाची गती सर्वाधिक असेल. आगामी एक दशकात भारतीय अर्थव्यवस्था सर्वात चांगले प्रदर्शन करेल. यादरम्यान मागणीही वाढणार आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मॉर्गन स्टॅनलीचे मुख्य आशियातील अर्थशास्त्रज्ञ चेतन अह्या यांनी म्हटले आहे की, भारताबाबत आम्ही सकारात्मक आहोत. अलिकडील मजबूत आकडेवारीनुसार, आम्हाला विश्वास वाटतो की, देशांतर्गत मागणी चांगली राहिल. पॉलिसीमेकर्सच्या सुधारणांमुळे स्थिती बदलेल. कमोडीटी प्राइजेसमधील घट आणि अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान झाल्याने रिकव्हरी चांगली झाली आहे. जर निर्यातीत घट आली तर त्याची भरपाई सेवा क्षेत्रातून केली जाईल. मार्चच्या तुलनेत कच्चे तेल आणि इतर कमोडिटीच्या दरात घट आल्याने परिस्थिती बदलली आहे. सद्यस्थितीत आरबीआयने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये १.४० टक्क्यांची वाढ केली आहे.