भारतात एप्रिल २०२३ पासून २० टक्के इथेनॉलचा पुरवठा सुरू

पानीपत : भारत पुढील वर्षी एप्रिलपासून निवडक पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉलसोबत पेट्रोलचा पुरवठा सुरू करेल आणि नंतर यामध्ये गती आणली जाईल, असे तेल मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले. इंधनाच्या आयातीमधील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणीय मुद्याबाबतही यातून मार्ग निघेल असे ते म्हणाले. मंत्री पुरी म्हणाले की, २०२५ पर्यंत इथेनॉल पेट्रोलचा पाचवा हिस्सा बनून जाईल. यावर्षी जून महिन्यात निर्धारीत वेळेपूर्वी १० टक्के इथेनॉल पुरवठ्याचे उद्दीष्ट पूर्ण केल्यानंतर २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाची उद्दीष्टपूर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ते म्हणाले की, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून ९०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करून पानीपत रिफायनरीजवळ स्थापन केलेल्या प्लांटमधून वार्षिक २ लाख टन तांदळाच्या भुश्यापासून जवळपास ३ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होईल. पिकाच्या शिल्लक घटकापासून इथेनॉल उत्पादन केल्याने शेतकरीही अधिक सशक्त होतील. त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल.
अमेरिका, ब्राझील, युरोपीय संघ, चीननंतर इथेनॉल भारत उत्पादक म्हणून जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे. जगभरात इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी केला जातो. मात्र, ब्राझील आणि भारतासारखे देश पेट्रोलमध्ये याचे मिश्रण करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here