मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाचे सत्र आजही सुरू राहिले. मुंबई हवामान केंद्राने शनिवारीही रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी १४ ऑगस्ट रोजी, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याआधी शुक्रवारीही महाराष्ट्रात पाऊस सुरूच होता. संततधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये आतापर्यंत १२० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच २४० जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे ३०० हून अधिक गावांचे नुकसान झाले आहे. तसेच ९५ जण जखमी झाले आहेत.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये हवेची गुणवत्ता ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला गेली आहे. आज शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३० आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान २८ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. वातावरण ढगाळ असेल आणि हलका पाऊस अपेक्षित आहे. औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या ठिकाणी अशीच स्थिती राहील.