लाहोर : पुढील गळीत हंगामाच्या सुरुवातीपूर्वी पाकिस्तानकडे १.२ मिलियन टन अथवा त्यापेक्षा अधित साखर अतिरिक्त असेल, असा दावा पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (PSMA) केला आहे. ही अतिरिक्त समस्या सोडवणुकीसाठी त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना अतिरिक्त साखरेला प्राधान्यक्रमाने निर्यातीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना लिहिलेल्या एका पत्रात PSMA ने म्हटले आहे की, ३१ जुलै २०२२ पर्यंत, साखर कारखान्यांकडे ३.०३ मिलियन टन साखर अद्याप उपलब्ध आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी उपलब्ध असलेल्या साखरेव्यक्तीरिक्त हा साठा शिल्लक आहे.
नव्या गाळप हंगामाआधी साखरेचा अनुमानीत खप लक्षात घेऊन १८ लाख टन साखरेचा वापर होण्याची अपेक्षा आहे. पत्रात म्हटले आहे की, ही स्थिती स्पष्ट करते की, पाकिस्तानकडे पुढील गळीत हंगामाच्या सत्रात म्हणजे नोव्हेंबर २०२२ च्या सुरुवातीला १.२ मिलियन टन अथवा त्यापेक्षा अधिक साखर निश्चित अतिरिक्त असेल. पत्रात पुढे म्हटले आहे की, उपलब्ध माहितीनुसार, गेल्या वर्षी २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये ऊस उत्पादनात १० टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अलिकडे झालेल्या जोरदार पावसामुळे ऊस पिकाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. या घडामोडींतून स्पष्टपणे असे संकेत मिळत आहेत की, पुढील वर्षी पुन्हा अतिरिक्त साखर असेल. पाकिस्तान सरकारने साखर उद्योगाला आपल्याकडील साखरसाठा संपविण्यासाठी आणि पुढील वर्षी अपेक्षित अतिरिक्त साखर साठा सांभाळण्यासाठी साखर उद्योगाला त्वरीत अतिरिक्त साखर निर्यातीस परवानगी देऊ शकेल.