नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. मात्र सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरापासून दिलासा मिळालेला नाही. दोन महिन्यांत कच्चे तेल ३० टक्क्यांनी स्वस्त झाले. त्यानंतर एका महिन्यात भाव १८ टक्क्यांनी कमी झाले. मात्र सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल महागडे दराने खरेदी करावे लागत आहे. कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, ७ ऑगस्ट कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल 92 डॉलरपर्यंत खाली आली. तरीही, सरकारी तेल कंपन्यांनी दर कमी केलेला नाही. ज्यावेळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली, तेव्हा सरकारी तेल कंपन्यांना डिझेलच्या विक्रीवर प्रती लिटर २० ते २५ रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागला. पेट्रोलच्या विक्रीवर १४ ते १८ रुपये तोटा झाल्याचा दावा पेट्रोलियम कंपन्यांनी केला आहे. आता तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांना होणारा तोटा कमी झाला आहे. सध्या तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये कोणताही तोटा होत नाही. मात्र, डिझेल विक्रीवर लिटरमागे चार ते पाच रुपयांचा फटका बसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी सरकारी तेल कंपन्या दर कमी करणार नाहीत असे सांगण्यात आले. सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रती लीटर दराने उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात किंवा गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात.