मेरठ : मेरठसह उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आता शेती आणखी हायटेक होणार आहे. विभागात ऊसावर पहिल्यांदाच ड्रोनद्वारे किटकनाशक तसेच नॅनो युरियाची फवारणी करण्यात येणार आहे. यातून ऊसाचे उत्पादन वाढेल. तसेच शेतकरी किटकनाशकांच्या दुःश्परिणामांपासून आपला बचाव करू शकतील. फवारणी ऊसाच्या वरील भागात असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होणार नाही. उत्पादन साधारणतः १८ टक्क्यांनी वाढेल. यापूर्वी अनेकदा किटकनाशकांच्या फवारणीवेळी शेतकऱ्यांना कॅन्सरचा फटका बसला आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हस्तिनापूरमध्ये अलिकडेच भाजप किसान मोर्चाच्या तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गात राज्याचे सहकार मंत्री जेपीएस राठोड यांनी सांगितले की, आगामी काळात शेतीमध्ये आधुनिक बदल करण्यात येत आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ड्रोनद्वारे नॅनो युरियाची फवारणी केली जाईल. ऊस शेतीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते वापरली जातात. त्यातून कॅन्सर उद्भवतो. त्यामुळे आधुनिक तंत्राचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसू शकतील असे मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. ड्रोनद्वारे उसाची औषध फवारणी हाताळण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.