मध्य प्रदेशला सातत्याने अस्मानी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत स्थिती बिघडली आहे. गेल्या २४ तासात मध्य प्रदेशातील अनेक भागात उच्चांकी पाऊस झाला आहे. अद्यापही पाऊस थांबलेला नाही. राज्यातील शिप्रा, नर्मदा, गंभीर, कालीसिंध, तवा, चंबलसह बहुतांश नद्यांना उधाण आले आहे. आणि अद्याप पाऊस सुरू असल्याने स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील नद्यांवरील सर्वच धरणांची दारे उघडण्यात आली आहेत. हवामान विभागाने अनेक ठिकाणी पुठढील २४ तासात उच्चांकी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, जीरापूरमध्ये २९४ मिमी पाऊस कोसळला. याशिवाय, राजगढ आलोट, रतलाम, आगर मालवा, सीहोर, जावरा, शामगढ, मंदसौर, रायसेन, गुना, भोपाल, विदिशा, शाजापूर, आगर मालवा, बैरागढ, रायसेन, नर्मदा पुरम, मनासा, उज्जैन 120, देवाससह अनेक भागात विक्रमी पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार मंगळवारीही येथे जोरदार पाऊस पडेल. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय कंट्रोल रुममधून सर्व ठिकाणी निगरानी ठेवण्यात येत आहे. जिथे स्थिती गंभीर वाटेल, तेथे विशेष दल पाठविण्यात येत आहेत. अनेक शहरातील बाजारपेठा मंगळवारी बंद राहिल्या.