देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या जोरदार पावसाने विद्ध्वंस केला आहे. तर काही राज्यांमध्ये मान्सून नियमीत आहे. मैदानी भागापासून डोंगराळ भागापर्यंत काही ठिकाणी पावसामुळे पुरासारखी स्थिती आहे. शिवाय, भूस्खलनाच्या घटनांनी भीती निर्माण केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वातावरण स्वच्छ आहे. मंगळवारीही दिवसभर जोरदार वाऱ्यामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दिल्लीत आज, २४ ऑगस्ट रोजी किमान तापमान २७ तर कमाल तापमान ३४ डिग्री सेल्सिअस राहिल अशी शक्यता आहे. मात्र, आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पावसाची शक्यता नाही.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशात आज पावसाची शक्यता आहे. राजधानी लखनौतील हवामान ढगाळ राहील. गाजियाबादमध्येही अशीच स्थिती असेल. मान्सूनच्या सुरुवातीपासून गुजरातमध्येही जोरदार पाऊस बरसला आहे. अनेक जिल्ह्यांत पुरासारखी स्थिती आहे. अहमदाबादमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार छत्तीसगडमध्येही २६ तसेच २७ ऑगस्ट रोजी पाऊस सुरूच राहिल. उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशात चांगल्या पावसाचे अनुमान वर्तविण्यात आले आहे.