नवी दिल्ली : प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, पुढील हंगामात साखर निर्यातीत घसरण होण्याची शक्यता आहे. याबाबत PTI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अन्नधान्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, २०२२-२३ या हंगामात देशाच्या साखर निर्यातीमध्ये २८.५७ टक्के घसरणीसह जवळपास ८ मिलियन टन कमी होईल अशी शक्यता आहे. पुढील हंगामात इथेनॉलसाठी ऊसाचा अधिक वापर होण्याची शक्यता आहे.
मात्र, खुल्या सामान्य लायसन्सअंतर्गत निर्यातीला परवानगी दिली जाईल अथवा सध्याच्या कोटा प्रणालीनुसार याचा निर्णय गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर दराच्या स्थितीचे आकलन करून घेतला जाईल. चालू हंगामात साखर निर्यात ११.२ मिलियन टन राहील असे अनुमान आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण साखर उत्पादन चांगले राहील अशी शक्यता आहे. मात्र, पुढील हंगामात निर्यात कमीच होईल.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (ISMA) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी Zee Business ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनासाठी ३४ लाख टन साखर वळविण्यात आली होती. आणि पुढील हंगामात जवळपास ४५ लाख टन साखर वळवली जाईल. म्हणजेच जवळपास ११ लाख टन जादा साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी होईल. झुनझुनवाला यांनी सांगितले की, ओपनिंग स्टॉक जवळपास ६० लाख टन राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सरकारकडे ८० लाख टन साखर निर्यातीची परवानगी मागितली आहे. याचा देशांतर्गत बाजारपेठेतील किमतींवर परिणाम होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.