शामली : जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या ऊस बिले देण्याच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शामली साखर कारखान्याच्या थकबाकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना पुढील हंगामात ऊस खरेदी केंद्रात कपात करण्याचे आदेश जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दिले. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी जर थकबाकी दिली नाही तर कारखान्याचे ऊस क्षेत्र घटविण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी शामली, ऊन आणि थानाभवन कारखान्याने २०२१-२२ या हंगामात ११५१.६५ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता असे सांगितले.
अमर उजालामधील वृत्तानुसार शामली कारखान्याने ३४७.६७ कोटी रुपये, ऊन कारखान्याने ३३७ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याने ४३९.९९ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता. शामली कारखान्याने सर्वात कमी १४९.९७ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. ऊन कारखान्याने १८९.७२ कोटी रुपये तर थानाभवन कारखान्याने २२९.१८ कोटी रुपयांची बिले दिली असल्याचे उघड केले. यावेळी जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी ऊस बिले देण्यात होत असलेल्या उशीराबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना तातडीने बिले द्यावीत असे निर्देश दिले. कारखान्यांना कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. एडीएम संतोष कुमार, शामली कारखान्याचे एव्हीपी प्रदीप कुमार आदी उपस्थित होते.