काठमांडू : भारत सरकारच्यावतीने नेपाळला गहू आणि साखरेच्या निर्यातीवर घालण्यात आलेले निर्बंध हटविण्याविषयी विचार केला जात आहे.
नेपाळी मीडिया Myrepublica मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धरानमधील सुनसारी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज द्वारे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, नेपाळमधील भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितले की, नेपाळसाठी दैनंदिन, जीवनावश्यक वस्तूंवरील निर्बंध हटविण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे.
भारताने १ जूनपासून साखर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे नेपाळमधील कृषी उत्पादनांचा पुरवठा अडचणीत आला आहे. त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. साखरेचा किरकोळ दर ११० रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचला आहे. तर स्थानिक बाजारपेठेत आट्याच्या दरात किमान १० रुपये प्रती किलोची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
राजदूत श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, मिरगंज ब्रिजच्या माध्यमातून वाहतूक पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा आहे. बिराटनगरमधील रानी बॉर्डर पासून तो दक्षिणेत चार किलोमीटरवर आहे. हा पूल गेल्या वर्षी नुकसानग्रस्त झाला होता.