नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात सध्या पाऊस सुरू आहे. पाऊस असाच सुरू राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, देशात मान्सून सक्रीय असल्याने पुढील ४ दिवसांत उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात तसेच मध्य भारतात पाऊस कोसळेल. आयएमडीने या भागात पावसामुळे पूर तसेच भूस्खलनाच्या घटना घडण्याची शक्यता घडू शकते असा अलर्ट दिला आहे.
न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम व मेघालयातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळेल. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये आज आणि उद्या, तसेच अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशातील काही भागात उद्या जोरदार पाऊस कोसळेल. मध्य प्रदेशलगतच्या छत्तीसगढमध्ये ६ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ओडिसामध्येही ५ आणि ६ सप्टेंबर रोजी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.