ढाका : बांगलादेश सरकारने आता साखरेसह नऊ वस्तूंची किंमत निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवता याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, किमत वाढीला लगाम लावण्याचे वारंवार केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांनी आपल्या मंत्रालयात संबंधीत विभाग, कायदा प्रवर्तन एजन्सींचे प्रतिनिधी तसेच व्यापार जगतातील नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. मंत्री मुन्शी म्हणाले की, देशांतर्गत बाजारात काही कमोडिटीच्या किमतीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. व्यापारी डॉलरच्या दरवाढीचा फायदा उचलत आहेत, हे यामागील कारण आहे.
मंत्री टिपू मुन्शी यांनी सांगितले की, बांगलादेशचा व्यापार आणि टेरिफ आयोग आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचे आकलन करेल. आणि नियमितपणे स्थानिक बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या योग्य दराची निश्चिती करेल. सर्व व्यापाऱ्यांना या किमतींचे पालन करावे लागेल. अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल. ते म्हणाले की, अलिकडेच साखरेच्या किमतीत वाढ दिसून आली होती. यादरम्यान, सरकारने विविध बाजारपेठांत अनेक छापे मारले आहेत. तरीही किमत वाढीवर काहीच परिणाम झालेला नाही. साखरेच्या किमती गेल्या एका महिन्यात जवळपास १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.