नवी दिल्ली : देशातील निर्यात ऑगस्ट महिन्यात १.१५ टक्के घटून ३३ अब्ज डॉलरवर आली आहे. तर व्यापार तुट घटून दुप्पटीहून अधिक, २८.६८ अब्ज डॉलर झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. एक वर्षापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये व्यापार तुट ११.७१ अब्ज डॉलर होती. सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्ट २०२२ मध्ये देशातील आयात एक वर्षाच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी वाढून ६१.६८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वाणिज्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात देशाची एकूण निर्यात ४५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक होईल, अशी शक्यता आहे. उत्पादनाच्या निर्यातीमुळे आम्ही या चालू आर्थिक वर्षात ४५० अब्ज डॉलरचा आकडा पार करू शकतो. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-ऑगस्ट या दरम्यान देशाची निर्यात १७.१२ टक्क्यांनी वाढून १९२२.५९ अब्ज डॉलर झाली आहे. तर आयात ४५.६४ टक्के वाढून ३१७.८१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या कालावधीत देशातील व्यापार तुट वाढून १२५.२२ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत ही तुट ५३.७८ अब्ज डॉलर होती.