गुरुहरसहाय : पंजाब संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानंतर फिरोजपूर-फाजिल्का येथील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत कॅबिनेट मंत्री फौजा सिंह सरारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी ऊसाला प्रती क्विंटल ४५० रुपये दर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी नेत्यांनी सरकारकडे जनावरांतील लम्पी स्कीन रोगाबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, या रोगाने बळी पडलेल्या जनावरांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. सरकारने जनावरांचे सर्वेक्षण करावे असे शेतकऱ्यांनी सांगितले.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी २०२२-२३ या हंगामात ऊस दर प्रती क्विंटल ४५० रुपये करण्याची मागणी केली. याशिवाय या हंगामातही ऊसाचा दर पूर्वीप्रमाणे २+५० % फॉर्म्यूल्याने दिला जावा यासाठी कायदेशीर तरतुद करावी, पंजाबमधील खासगी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे थकीत असलेले पैसे १५ टक्के व्याजासह मिळावेत असेही शेतकऱ्यांनी सांगितले. ऊस हंगामातील अडचणी दूर करण्याकडे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावे असेही शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी गुरमीत सिंह मेहमा, रेशम सिंह मिढा, स्वर्ण सिंह, हरनेक मेहमा, राकेश लाधुका, सुखचैन सिंह आजाद, मलकीत सिंह आदींची भाषणे झाली.