मुरादाबाद : जिल्ह्यात चांगले उत्पादन देणारी उसाची सीओ ०२३८ प्रजाती रोगाच्या विळख्यात सापडली आहे. ऊस विभाग आता हे ऊस बिज बदलण्याच्या तयारीत आहे. यावरील रोगामुळे उत्पादन २० टक्के घटण्याची शक्यता आहे. ऊस विभागाने कृषी संशोधन केंद्राच्या प्रस्तावानुसार इतर प्रजातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. विभागाने यावेळी जिल्ह्यात ०२३८ ऐवजी इतर वाणांची लागवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. संभल जिल्ह्यात ५४ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेतले जाते. पाच वर्षांपूर्वी दाखल झालेल्या ०२३८ प्रजातीने चांगले उत्पादन दिले. त्याचा फायदा कारखानदार आणि शेतकऱ्यांनाही झाला. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
अमर उजालामधील वृत्तानुसार, आता या वाणावर मोठ्या प्रमाणात रोगांचा फैवाल झाला आहे. गेल्या वर्षीपासून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. किटकनाशके, औषधे वापरूनही रोगाला आळा घालता आलेला नाही. कृषी अधिकाऱ्यांनी २० टक्के पिकाचे नुकसान होईल असे सर्व्हेनंतर सांगितले. ०२३८ प्रजातीवर पोक्का बोईंग, लाल सड रोग, टॉप बोरर अशा तिन्ही रोगांनी मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ऊस विभागाने आता शहाजहांपूरची सीओएस १३२३५, सीओएलके १४२०१ आणि सीओएलके १५०२३ या प्रजातीच्या उसाची लागवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.