ऊस बिले न मिळाल्याने नाराज शेतकऱ्यांचे आंदोलन

बलरामपूर : इटईमैदातील बजाज साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कोल्हुइया भोजपूरमधील शेतकऱ्यांनी ऊस बिले न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी शेतातच निदर्शने करत सरकारने या विभागातील ऊस बजाज कारखान्याऐवजी बलरामपूर साखर कारखान्याला मंजूर करावा अशी मागणी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडे केली. जर उसाचा कोटा या कारखान्याला दिला गेला नाही, तर आम्ही ऊस शेती बंद करू असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

अमर उजालामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, विभागातील शेतकरी हरीराम, राजेंद्र सिंह, गणेश, राहुल, हनीफ, चिनके, स्वामीनाथ, अयोध्या प्रसाद, अरविंद कुमार, विभुती प्रसाद आदी शेतकऱ्यांनी निदर्शने करताना सांगितले की, गळीत हंगाम संपून सहा महिने उलटले तरी कारखान्याने एकाही शेतकऱ्याला पैसे दिलेले नाहीत. बजाज कारखाना दरवर्षी शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. दुसऱ्या पिकासाठी शेतकऱ्यांना उधार-उसनवारी करावी लागते. बिल मिळविण्यासाठी शेतकरी कारखान्याला फेऱ्या मारत आहेत. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करतात. एकीकडे बजाज कारखान्याने पैसे थकवले असताना, बीसीएम ग्रुपच्या बलरामपूर आणि तुलसीपूर कारखान्याने शंभर टक्के बिले दिली आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. जर येथील ऊस या कारखान्यांना पाठविण्यास संधी दिली नाही, तर ऊस शेती बंद करू असा इशारा त्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here