डोईवाला : काशीपूर ऊस संशोधन संस्थानच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात शास्त्रज्ञांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पिकांची चांगली वाढ व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. उमेदपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात काशीपूर ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ प्रमोद कुमार सिंह यांनी उसाच्या प्रगत प्रजाती, ऊस उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान, नॅनो युरिया, ऊस लागवडीतील ट्रेंच पद्धतीची माहिती दिली. प्रगत तंत्राचा वापर करून अधिकाधिक उत्पादन कसे घेता येते, याविषयी प्रमोद कुमार यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डेहराडूनमधील ढकरानी कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. संजय कुमार राठी यांनी ऊस पिक व्यवस्थापन तसेच उसावरील विविध रोग, किडी कशा ओळखाव्यात याविषयी मार्गदर्शन केले. किडींचे नियंत्रण कसे करावे, याविषयी उपाय त्यांनी सांगितले. काशीपूरच्या ऊस संशोधन केंद्राचे संचालक राजेश कुमार यांनी ऊस पिकासोबत आपल्याला पूरक पिके कशी घेता येतात, जैविक शेतीचे तंत्र कसे वापरावे याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक श्रीपाल सिंह यांनी माती परीक्षण तसेच खोडवा उसाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. ऊस पर्यवेक्षक प्रकाश भट्ट यांनी कृषी विभागाच्या योजना, शेतकऱ्यांना होणारे लाभ याविषयी माहिती दिली.